खेडी मायनरच्या १२ कोटीच्या कामात दिरंगाई – शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी

38

 

 

नियोजना अभावी शेतकऱ्यांना नेहेमी पाणी टंचाईचा सामना

 

सावली – (सुधाकर दुधे)

 

असोलामेंढा प्रकल्पांतर्गत खेडी मायनरचे बंद नलिकेचे काम मागील सात वर्षांपासून सुरु असून अजूनपर्यंत पूर्ण झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष आहे.

गोसेखुर्द व असोलामेंढा तलाव हे सावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. खेडी लघु वितरिकाद्वारे होणारा पाणीपुरवठा सिंचनासाठी कमी पडत असल्याने वितरिकेचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले. खुल्या पारंपारिक पद्धतीने काम केल्यास भुसंपादन व बांधकाम खर्च जास्त किंमतीचा होत असल्याने भूमिगत पाईपलाईनंद्वारे काम करण्याचा निर्णय २०२७ मध्ये घेण्यात आला. कामाचा आदेश २०१७ मध्ये झाला व प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली. सन २०१९ ला काम पूर्ण करण्याचा कालावधी असतांना २०२६ वर्ष उजाडले मात्र काम पूर्ण झालेले नाही. कामाच्या या दिरंगाईपणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी खरीप हंगामात नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तरी काम पूर्ण होऊन बंद नलिकेद्वारे पाणी सिंचनासाठी मिळणार काय? ही आशा शेतकरी लावून बसला आहे.

 

*कामाची किंमत*

खेडी लघु कालव्याचे काम खुल्या पद्धतीने केल्यास भुसंपादन व बांधकामाची किंमत २६ कोटी २९ लक्ष रुपये होत असल्याने बंद पाईपलाईनद्वारे १२ कोटी ८५ लक्ष रुपयात होत असल्याने बंद पाईपद्वारे काम करण्याचा आराखडा तयार करण्यात आला.

 

कासवगतीने काम करणारी कंपनी

असोलामेंढा प्रकल्प सावलीचे कार्यकारी अभियंता यांनी पी. वेंकटा रामानाईया यांना दिनांक २० ऑक्टोबर २०१७ ला कामाचे आदेश दिले. सदर काम पूर्ण करायचा कालावधी १५ महिन्याचा होता व काम बघणारी यंत्रणा उपभियंता असोलामेंढा उपविभाग क्र. ७ होते. काम पूर्ण न झाल्यामुळे सदर कंपनीवर विभागाकडून दंड आकारला जातोय की मेहरबान आहे हे कळायला मार्ग नाही.

 

काम निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड

सदर कामात खोदकाम केल्यानंतर मुरुमाचा वापर करायचा आहे व त्यानंतर पाईप जोडणी करायची आहे परंतु कामाचा दर्जा राखला जात नसल्याची ओरड आहे. काम करण्यासाठी खोदकाम केल्या जाते मात्र पाईपची उपलब्धता नसल्याचे कारण देत बुजविल्या जात असून अनेक ठिकाणी पाईप फुटलेले आहे. वारंवार खोदकाम करीत असल्याने शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

 

आराखड्यानुसार काम नाही, पाणी वापर संस्थेला अर्धवट काम हस्तान्तर करण्याचा डाव

कामाचा आराखडा नकाशा तयार करण्यात आला मात्र त्यानुसार काम होत नसून चढ उतार न बघता पाईप टाकण्यात येते आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहण्याची पाळी भविष्यात येणार आहे. काम पूर्ण झालेला नसतांना कंपनीकडून पाणी वापर संस्थेला हस्तान्तर करून घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे मात्र पाणी वापर संस्था अर्धवट व निकृष्ट काम असल्याने हस्तान्तरकरण्यास मनाई करीत आहे.

 

कोट :-

काम दर्जाहीन असल्यामुळे आसोलमेंढा प्रकल्पाचे अधिकारी प्रत्यक्ष कामावर येणार नाही तो पर्यंत काम करू देणार नाही .यासाठी शेतकऱ्यांना घेऊन विभागीय कार्यालयात आंदोलन करू.

विजय कोरेवार

माजी सभापती पं. स. सावली