ट्रॅव्हल्स उलटली 50प्रवासी जखमी २० गंभीर …..

81

हिरापूर टोल नाक्या जवळ भीषण अपघात 

अपघातात चिमुकल्यांचा समावेश

सावली

ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगाने धावणारी ट्रॅव्हल्स पलटून झालेल्या भीषण अपघातात तब्बल ५० प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये २० प्रवासी गंभीर जखमी असून उर्वरितांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात चंद्रपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर हीरापूर नजीक टोल नाक्याजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली येथील एच.के.जी.एन.नामक ट्रॅव्हल क्र.एम.एच.०४ जि. पि.१७३६ नेहमीप्रमाणे क्षमतेपेक्षा अधिक, जवळपास ७०ते७५ प्रवासी घेऊन चंद्रपुर वरुण गडचिरोलीकडे जात होती. दरम्यान, टोल नाक्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की प्रवासी एकमेकांवर आदळून जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक व महामार्गावरील प्रवासी मदतीसाठी धावून आले. जखमींना तत्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी गडचिरोली व चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमी प्रवाशांनी आपल्या सोयीप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे, याच टोल नाक्याजवळ मागील आठवड्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मोठा अपघात झाल्याने या परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून भरधाव व अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हलच्या चालकाविरुद्ध कारवाई होणार का, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्याकडे प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून अपघाताचे कारण नेमके शोधले जात आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजीत आमले घटनास्थळी धाऊन आले पुढील तपास सुरू आहे ……