हरदास हायस्कूलच्या 1982 बॅचचा भावनिक मिलन सोहळा!*

181
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

Kknews 24

कामठी. आठवणींच्या गाभाऱ्यात खोलवर रुतून बसलेल्या शाळेच्या दिवसांना उजाळा देणारा, नात्यांच्या गाठी पुन्हा घट्ट करणारा एक आगळावेगळा प्रसंग नुकताच अनुभवायला मिळाला. हरदास हायस्कूलमधून 1982 साली दहावी उत्तीर्ण झालेला माजी विद्यार्थ्यांचा समूह तब्बल 43 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आला आणि आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण पुन्हा एकदा अनुभवला.

या गेट-टुगेदरचे औचित्य होते — एलआयसी नागपूर शाखेत सहव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले हरदास हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. राजन शेंडे आणि त्यांच्या सहधर्मचारिणी कविता शेंडे यांचा लग्नाचा वाढदिवस. आपल्या या खास क्षणात नातलगांऐवजी शाळेसवंगड्यांनाच सोबतीला घेण्याचा आगळा निर्णय राजन शेंडे यांनी घेतला आणि यामुळे या कार्यक्रमाला एक अनोखी भावनिक छटा लाभली.

राजन शेंडे यांनी ग्रुपवरील आणि वैयक्तिक पातळीवरील निमंत्रणाच्या माध्यमातून आपल्या सर्व शाळासवंगड्यांना एकत्र आणले. १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता, ठरलेल्या स्थळी सर्वांची उपस्थिती लागली आणि एकेकाळी एकत्र शाळेत खेळलेले, हसलेले, शिकलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकमेकांच्या मिठीत अलगद विरघळले.

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रूंनी ओलावलेली नजर, गळाभेटीचा भरजरी क्षण आणि केक कटिंगसह प्रेमाने भारलेले वातावरण… हे सारे क्षण जणू काळाच्या पटलावर कोरले गेले. राजन आणि कविता शेंडे यांच्यावर पुष्पवृष्टी झाली, आणि सर्व मित्र-मैत्रिणींनी त्यांना आपल्या प्रेमाचे स्मरणरूप भेटवस्तूंमधून अर्पण केले.

त्यानंतर सुरू झाला संगीत, नृत्य आणि धमाल मस्तीचा कार्यक्रम. तरुण वयाची उर्मी पुन्हा एकदा जागी झाली. लयबद्ध गाण्यांवर साऱ्यांनी मनमुराद नृत्य केले. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला आणि बालमैत्रीचे ते निरागस बंध पुन्हा नव्याने जपले गेले.

या अविस्मरणीय आयोजनासाठी सर्वांच्या वतीने राजन शेंडे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. ‘आता अशा भेटी अधिकाधिक व्हाव्यात, आपल्या हरदास हायस्कूल ग्रुपची ही उब जपली जावी’, असा संकल्पही सर्वांनी एकमताने केला.

आजच्या धावपळीच्या काळात शाळेतील मैत्रीचे धागे पुन्हा एकत्र गुंफण्याचा आणि आठवणींना सोन्याहून पवित्र रूप देण्याचा हा प्रसंग खरंच जीवनात अमूल्य ठेवा म्हणून सर्वांच्या मनात कोरला गेला.