सावली नगरपंचायतीची धडक कारवाई

331

अवैध टिल्लू पंप जप्ती, पुढे कठोर कारवाईचा इशारा

 

सावली नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असताना काही स्वार्थी नागरिकांनी नियम धाब्यावर बसवत अवैध टीलु पंप बसवून पाणी ओढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे अनेक सामान्य नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

या गंभीर तक्रारींची तात्काळ दखल घेत सावली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्या निर्देशानुसार नगरपंचायत प्रशासनाने शहरात धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत सावली शहरातील एकूण १७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १४ मधील ३, प्रभाग क्रमांक १३ मधील २, प्रभाग क्रमांक ७ मधील १ तसेच सहा महिन्यांपूर्वी ३ अशा एकूण ९ नागरिकांकडून अवैधरित्या वापरले जाणारे टीलु पंप जप्त करण्यात आले.

अवैध पाणीपुरवठा करणाऱ्यांमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून अशा प्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत नगरपंचायत प्रशासनाने भविष्यातही अशाच पद्धतीने कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करून अवैध टीलु पंप लावणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच दहा हजार रुपये व नळ कनेक्शन बंद करण्यात येईल ,पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठो नळाला तोटी लावून नसल्याचे निदर्शनात आल्यास 10000 रुपये दंड व नळ कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना पाणी हा सार्वजनिक स्रोत असून त्याचा गैरवापर न करता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

सावली (सुधाकर दुधे)